रत्नागिरी:- जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी राजीनामा सादर केल्यानंतर उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी प्रभारी म्हणून बुधवारी (ता. 3) अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. त्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत कामकाज पाहण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे. नवीन पदाधिकारी निवडीची बैठक तोपर्यंत अपेक्षित आहे.
जिल्हा परिषद विषय समिती सभापतींबरोबर अध्यक्ष रोहन बने यांनी राजीनामा सादर केला. त्यानंतर बुधवारी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांना प्रभारी अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. अध्यक्षपदाचा सन्मान मिळवून देण्यासाठी शिवसेनेकडून सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत तोच पायंडा पाडण्यात आला होता. यंदा त्यात बदल होईल अशी अपेक्षा होती; परंतु आयत्यावेळी वरीष्ठांचे आदेश आले आणि उपाध्यक्षांचा राजीनामा मंजूर करण्याऐवजी अध्यक्षांना पुढे करण्यात आले. नाटेकर यांच्याकडे प्रभारी पद गेल्यामुळे प्रथमच गुहागर तालुक्यातील सदस्याना हा सन्मान मिळाला आहे. आज सकाळी रोहन बने, गटनेते उदय बने यांच्या उपस्थितीत नाटेकर हे खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी त्यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. मिळालेल्या कालावधीचा विकासासाठी उपयोग करु असे आश्वासन यावेळी नाटेकर यांनी दिले.
विषय समिती सभापतींचे राजीनामे सामन्य प्रशासन कडून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. अध्यक्ष पदाची निवडीसंदर्भात आयुक्तांकडून कार्यवाही होईल. आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन निवडणुक कार्यक्रम जाहीर करेल. यासाठी 22 फेब्रुवारी उजाडेल असा अंदाज आहे. तोपर्यंत नाटेकर यांना अध्यक्षपदाचा कारभार चालवायचा आहे.









