रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोडचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर केली असून, महाद्वाराजवळ याबाबतचा फलक लावण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या मंदिराला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून आणि परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. या मंदिराच्या पावित्र्याचा आदर राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्याने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कमी कपड्यांतील किंवा ‘ट्रीप मूड’ मधील पेहराव, जो समुद्रावर जाण्यासाठी योग्य आहे, अशा प्रकारचे कपडे परिधान करता येणार नाहीते. गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करू नये. असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे घालू नयेत. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अशा वेळी कोणताही आग्रह धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.१० वर्षांखालील मुलांना या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे मंदिरातील धार्मिक वातावरण राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. ही नियमावली लागू झाल्याने मंदिराच्या पावित्र्याचा आदर राखला जाईल आणि भाविकांना शांत व पवित्र वातावरणात दर्शन घेता येईल.