रत्नागिरी:- महायुतीतील गैरसमज शुक्रवार पर्यंत दूर होतील. ज्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, तेथे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. काहींचे गैरसमज झालेत ते दूर होतील आणि उद्या महायुतीचे चित्र स्पष्ट होईल,” असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जयस्तंभ येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतीमधील महायुतीबाबत त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. खेडमध्ये वैभव खेडेकर आपली उमेदवारी मागे घेतील. वैभव खेडेकर माझे चांगले मित्र आहेत. ते महायुतीचा धर्म नक्कीच पाळतील आणि आपली उमेदवारी मागे घेतील. महायुतीतील गैरसमज दूर होऊन उद्या (शुक्रवारी) रत्नागिरीतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी युती झाली नाही, तर रत्नागिरीत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे संकेतही सामंत यांनी दिले. मात्र, “राजेश सावंतांच्या पत्रकार परिषदेवर मी काही बोलणार नाही, मी फक्त विकास कामांविषयी बोलेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चिपळूणमधील राजकीय परिस्थितीवर बोलताना सामंत यांनी महत्त्वाची आकडेवारी दिली. चिपळूणमध्ये शिवसेनेच्या १६ तर भाजपच्या १२ उमेदवारवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर निकम हे युतीविषयी सकारात्मक आहेत. आमच्या चर्चा सुरु असून उद्यापर्यंत चिपळुणातील युतीचा निर्णय अंतिम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.









