अनिकेत तटकरेंच्या बिनविरोध निवडीच्या श्रेयवादापासून स्वतःला ठेवले अलिप्त
रत्नागिरी:- कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयाचे श्रेय आपल्याला देण्यात येत असले, तरी या संपूर्ण प्रक्रियेत आपले कोणतेही योगदान नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी स्पष्ट केले. निवडणुकीतील उमेदवारी माघारीच्या निर्णयाची पूर्वकल्पनाही आपल्याला देण्यात आली नव्हती, अशी खंत व्यक्त करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत समन्वयावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, की जागावाटपाच्या प्रारंभीच्या चर्चेत आपण सहभागी होतो. त्या वेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा होऊन भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद देण्याच्या बदल्यात कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचे ठरले होते. त्यानुसार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर मागे घेण्यात आला.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आपल्याला सोशल मीडियावरून समजली, असे सांगत सामंत म्हणाले, “मी त्या वेळी परभणीत प्रचारात होतो. रत्नागिरीत काय घडत आहे, याची कोणतीही माहिती मला देण्यात आली नव्हती.”
ते पुढे म्हणाले, “बिनविरोध निवडणूक करायची होती, तर पालकमंत्री म्हणून मला विश्वासात घेणे अपेक्षित होते. पाच वेळा पराभूत केलेल्या उमेदवाराबाबत एवढा मोठा निर्णय घेताना किमान पूर्वकल्पना तरी द्यायला हवी होती.” या विजयाचे श्रेय घेण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागे भाजपचे नेते तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यानंतर माने यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आले आहे. या सर्व घडामोडींमध्ये उदय सामंत यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.









