नमिता कीर; जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘ग्रंथप्रदर्शन’
रत्नागिरी:- मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या विचारांची आणि संवेदनांची खरी ताकद आहे. आपली भाषा हीच आपली ओळख असून, ती जपणे आणि जोपासणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.
कुवारबाव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ‘ग्रंथप्रदर्शन’ आणि विविध उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते ‘भारतीय ज्ञानप्रणाली ग्रंथदालनाचे’ लोकार्पण करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या मातोश्री कमलाबाई विसपुते स्कूलच्या मुख्याध्यापिका विभावरी जोईल यांनी स्पष्ट केले की, मराठीच्या प्रचारासाठी केवळ प्रमाण भाषा पुरेशी नाही, तर दैनंदिन जीवनात बोलीभाषांचा सक्रिय वापर होणे काळाची गरज आहे.
उद्घाटन झालेले ‘भारतीय ज्ञानप्रणाली ग्रंथदालन’ आता सर्व वाचकांसाठी खुले करण्यात आले आहे. या सोहळ्याला स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, ग्रंथप्रेमी, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी आणि मराठी भाषा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शशांक नाईक यांनी मानले. रत्नागिरीतील ग्रंथ चळवळीला गती देण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









