Friday, May 1, 2026
spot_img
Home राजकीय मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रचार

मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रचार

संगमेश्वर पोलिस ठाण्यात उमेदवाराकडून तक्रार दाखल

संगमेश्वर:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अंतर्गत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत मूचरी (गट क्रमांक 43) येथील जिल्हा परिषद उमेदवार प्रा. ललिता रोहित तांबे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

07 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.30 वाजल्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. याच दिवशी सायंकाळी सुमारे 04.30 वाजता, मतदान केंद्र क्रमांक 43/24, जिल्हा परिषद केंद्र शाळा, मुचरी (नूतन-जुनी इमारत) येथे उमेदवार म्हणून भेट देण्यासाठी जात असताना मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात एका दुकानाच्या व्हरांड्यात दोन इसम प्रचार करत असल्याचे दिसून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित इसमांकडे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सौ. माधवी गिते व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार सौ. आरुषी घवाळी यांचे फोटो, निवडणूक चिन्ह असलेली डमी मशीन पत्रके, महायुतीतील नेत्यांचे फोटो असलेल्या मतदार स्लिप्स तसेच पांढरी पाकिटे होती. हे साहित्य वापरून मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर इसमांनी आपली नावे सांगण्यास नकार दिला, मात्र स्थानिक नागरिकांकडून त्यांची नावे शांताराम गणू टोपरे व शिवम संतोष सुर्वे (रा. मुचरी, ता. संगमेश्वर) असल्याचे समजल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेचे मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून याबाबत मतदान केंद्राध्यक्ष तसेच संगमेश्वरच्या तहसीलदार यांना तात्काळ माहिती देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत प्रा. ललिता रोहित तांबे यांनी सौ. माधवी गिते, सौ. आरुषी घवाळी तसेच शांताराम टोपरे व शिवम सुर्वे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.