रत्नागिरी:- करबुडेहून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मजगाव रोड येथे अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराच्या मागे बसलेल्या तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यल्लप्पा दऱ्याप्पा जगदाने (वय ३१, रा. नराळे, पो. पारे, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हि घटना शुक्रवारी (ता. ३०) दुपारी एकच्या सुमारास मजगाव रोड रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविराज विनोबा राजके (वय २८, रा. सातारा) हे यल्लाप्पा जगदाने यास घेऊन करबुडे हून रत्नागिरीकडे येत होते. मजगाव रोड येथे आले असताना दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये यल्लप्पा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी परकार हॉस्पिटल येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर जखमी रविराज राजके यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात कसा झाला या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. शहर पोलिस अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









