दापोली:- दापोली तालुक्यातील प्रस्तावित भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प तसेच चिखलगाव येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार अर्चना बोंबे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
भिवबंदर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्ती, शेती, बागायती, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. दापोली तालुका हा निसर्गसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनाशी निगडित नैसर्गिक साधनसंपत्तीला बाधा आणणारे प्रकल्प लादू नयेत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
दरम्यान, चिखलगाव येथील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पालाही स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाच्या विरोधात चिखलगावातील महिला मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात दाखल झाल्या. त्यांनी प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करत तहसीलदारांकडे आपली भूमिका मांडली.
ग्रामस्थांचा विकासाला विरोध नसून स्थानिकांचे हक्क, पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करूनच विकास झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. मोठे औद्योगिक किंवा ऊर्जा प्रकल्प उभारताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे, त्यांच्या हरकती जाणून घेणे तसेच प्रकल्पाचे पर्यावरणीय व सामाजिक परिणाम स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्प आणि चिखलगाव बॉक्साईट प्रकल्प या दोन्ही मुद्द्यांवर स्थानिक नागरिकांची भूमिका अधिक आक्रमक होत असून, तहसील कार्यालयात ग्रामस्थ आणि महिलांनी दाखविलेली एकजूट प्रशासनासाठी महत्त्वाचा संदेश मानली जात आहे.
दोन्ही प्रकल्पांबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार अर्चना बोंबे यांच्याकडे निवेदन सादर करून आपला विरोध नोंदविला आहे. त्यामुळे प्रशासन या निवेदनातील मागण्या आणि ग्रामस्थांच्या हरकतींबाबत कोणती भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रकल्पांबाबत कोणताही निर्णय घेताना स्थानिक जनतेचा आवाज ऐकला जावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.









