भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेला गाळ काढण्यासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक 

रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेल्या गाळाची पत्तन विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि मत्स्य खात्यांच्या अधिकार्‍यांनी यांत्रिक बोटीने प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी असलेला गाळ काढण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्यात येणार असून पावसाळ्यापुर्वी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे राजीवडा येथील मच्छीमारांनी मांडवी बंदरातील गाळ काढून मच्छीमारांच्या नौकांसाठी चॅनेल मोकळा करुन मिळावा अशी मागणी केली होती. मंत्री सामंत यांच्या सूचनेनंतर मेरीटाईम बोर्ड, पत्तन विभाग आणि मत्स्य खात्याच्या अधिकार्‍यांनी मच्छिमार संघर्ष समितीचे पदाधिकारी नजीर वाडकर, शफी वस्ता, इमान सोलकर, युसूफ भटकर, रहिम दलाल, रफीक फणसोपकर यांच्यासह मांडवीच्या मुखाशी साचलेल्या गाळाची बोटीवरून पाहणी केली. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी गाळाची माहिती दिली. त्यानुसार पाहणी करून अधिकार्‍यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छिमारांच्या नौका समुद्रात जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. या मार्ग गाळाने भरला आहे. तसेच या मार्गात खडकही तयार झाल्याने मच्छिमारांसाठी धोका निर्माण झाला आहे या गाळामुळे अनेक बोटींचे अपघात होऊन खलाशी दगावले तसेच बोटींचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे हा गाळ उपसण्याची तसेच बंधारा घालण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे सुरु आहे. संबंधित विभागाकडून पाहणी करण्यात आल्यामुळे मच्छीमारांना हा चॅनेल लवकरच मोकळा करुन मिळेल असा विश्‍वास निर्माण झाला आहे. मांडवी येथील गाळ काढण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये मंजूर असल्याचे जनता दरबारात पालकमंत्री सामंत यांनी सांगितले होते. त्या निधीतून येत्या काही दिवसांमध्ये गाळ काढण्याचे काम सुरु होणार आहे.