रत्नागिरी:- भाजपमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि सध्या ओबीसी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे निष्ठावान कार्यकर्ते अमित विलणकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. पक्षातील प्रभाग क्रमांक १५ मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विलणकर यांनी आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
युवक तालुकाध्यक्ष पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे अमित विलणकर हे गेली अडीच दशके भाजपशी एकनिष्ठ होते. सध्या ते भाजपच्या ओबीसी शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते. नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असणारे अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, सामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे म्हणून ते ओळखले जातात.
प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, मात्र पक्षांतर्गत घडामोडींमुळे आणि काही महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या माध्यमातून प्रदीर्घ काळ नागरिकांची सेवा केल्यानंतर आता त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १५ मधील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
विलणकर यांचा हा निर्णय भाजपसाठी रत्नागिरीत मोठा धक्का मानला जात आहे, कारण एक निष्ठावान आणि जनमाणसात चांगली प्रतिमा असलेला कार्यकर्ता भाजपने गमावला आहे.









