प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; जयगड पोलीस अंधारात?
रत्नागिरी:- भाऊबंदकीतील वाद उफाळून आला आणि राग अनावर होताच फायरिंग करून धाक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र दहशत माजवण्यासाठी फायरिंग करणार्याला पोलिसांनी रातोरात सोडले तरी कसे? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. ही घटना वरवडे-जयगड परिसरात घडल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील वरवडे-जयगड परिसरात भाऊबंदकीतील वाद उफाळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत हमरीतुमरी होऊन चक्क बंदुकीतून फायरिंग केल्याचा प्रकार घडला आहे. एका वाडीतील घराजवळ हा प्रकार घडला. या फायरिंगमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.
फायरिंग झाल्याची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी एका संशयिताला रातोरात ताब्यात घेतले. मात्र त्याला पोलीस स्थानकात घेऊन गेल्यानंतर अचानक त्याला सोडून देण्यात आले. फायरिंग केल्याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. परिसरात या घटनेमुळे चर्चा सुरू होती. मात्र फायरिंग करणारी व्यक्ती रातोरात घरी आल्याने हा प्रकार तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.स्वसंरक्षणासह शेतीची रखवाली करण्यासाठी प्रशासनाकडून बंदुकीचे लायसन्स दिले जाते. सध्या बंदुकीचे लायसन्स मिळवण्याची नवी क्रेझ सुरू झाली आहे. अनेकांना रिव्हाल्व्हर बाळगण्याचा छंददेखील लागला आहे. मात्र या वेपन्सचा दुरूपयोग होत असून भर वस्तीत फायरिंग करूनदेखील फायरिंग करणारा मोकाट सुुटतोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून कुंपणच शेत खातयं की काय? अशी चर्चादेखील सुरू आहे.









