चार महिन्यांनी स्विफ्ट चालकावर गुन्हा दाखल
राजापूर:- आडीवरे ते रत्नागिरी जाणाऱ्या मार्गावर नवेदर ते कोंडसर बस स्टॉपदरम्यान स्मशानभूमीसमोर भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना ५ मे रोजी सकाळी ९:५५ वाजण्याच्या सुमारास घडली. आडीवरे ते रत्नागिरी मार्गावरून फिर्यादी प्रकाश राजाराम साळवी (वय ५५ वर्षे, रा. वाडापठ आडीवरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, मूळ रा. फणसवणे कुंभारवाडी, ता. संगमेश्वर) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक: MH-08-AC-6604) चालले होते. यादरम्यान, मागून भरधाव वेगात आलेल्या मारुती स्विफ्ट कारच्या (क्रमांक: MH-08- R-5288) चालकाने, यासीर निसार हबीब (वय ३० वर्षे, रा. नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याने आपली गाडी अत्यंत निष्काळजीपणे व वेगात चालवून फिर्यादीच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी प्रकाश साळवी यांच्या उजव्या व डाव्या पायाला तसेच उजव्या हाताला गंभीर व साधी दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी उशिराने मिळालेल्या फिर्यादीनुसार १५ सप्टेंबर रोजी राजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९९/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), (ब), ३२४(५) तसेच मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.









