राजापूर गंगातीर्थ फाटा येथील घटना
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर हद्दीतील गंगातीर्थ फाट्यादरम्यान भरधाव अर्टिगा कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला आल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण आणि अर्टिगावरील चालक गंभीर जखमी झाले आहेत. २ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणित तुकाराम पाटील (वय ३५, रा. पनवेल, जि. रायगड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, त्यावरून अर्टिगा कारचा चालक शुभम नरेंद्र पाटील (वय २०, रा. कल्याण पश्चिम) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणित पाटील हे आपल्या कुटुंबासह टाटा टिगॉर कारने (एमएच-४६-सीएच-९१९६) पनवेलहून आचरा (मालवण, सिंधुदुर्ग) या दिशेने जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना, राजापूर येथील गंगातीर्थ फाट्यासमोर विपरीत दिशेने (गोवा ते मुंबई लेनवरून) येणारी मारुती सुझुकी अर्टिगा कार (एमएच-०५-एफव्ही-७२६९) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता अत्यंत भरधाव व निष्काळजीपणे चालवली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार मध्यवर्ती डिव्हायडर ओलांडून थेट मुंबई ते गोवा जाणार्या लेनवर आली आणि प्रणित पाटील यांच्या कारवर जाऊन धडकली.
या भीषण अपघातात टाटा टिगॉर कारमधील प्रणित यांची आई आशा तुकाराम पाटील (वय ५०), पत्नी श्रद्धा प्रणित पाटील (वय ३०) आणि अवघ्या ११ महिन्यांची चिमुकली इरा प्रणित पाटील यांच्यासह फिर्यादी व आरोपी चालक शुभम पाटील हे सर्वजण लहान-मोठ्या दुखापतींमुळे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
महामार्गावर वाढती वाहनांची वेगमर्यादा आणि नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने किंवा अविचाराने गाडी चालवल्यामुळे निष्पाप प्रवाशांचे प्राण धोक्यात येत असून, या प्रकरणी राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.









