मुंबई पोलिसांकडूनही माहिती घेणार
रत्नागिरी:- तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशात जन्म झालेल्या व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस तपासात नेमके काय आढळून आले याची माहिती मुंबई पोलिसांकडून घेतली जाईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी दिली.
बांगलादेशात जन्म झालेल्या एकाची जन्मतारीख १ मे १९८३ होती. त्याने शिरगाव ग्रामपंचायतीकडे जन्मदाखला मागितला. त्यानुसार २०२० साली हा दाखला दिला गेल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात आढळले. या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल तत्कालीन जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी घेतली व ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी सावके यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. दोषारोपपत्र तयार करुन त्यावर खुलाशाची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून माहिती घेण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.