बंद फ्लॅट फोडून 3 लाखांचा माल लंपास

रत्नागिरी:- शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. सन्मित्रनगर येथील बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने १ लाख रूपयांची रोकड व १ लाख ९५ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असा मिळून २ लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थांबलेले घरफोड्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला चोरट्यांनी रत्नागिरीत पोलिसांची झोप उडवली आहे. सन्मित्रनगर येथील अमेय रेसिडेन्सीमध्ये राहणारे सादिक मोहम्मद होडेकर हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. अवघ्या पाऊण तासासाठी घराबाहेर गेलेल्या होडेकर यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी फ्लॅटमधील १ लाख रूपयांची रोकड व १ लाख ९५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी सादिक मोहम्मद होडेकर यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंविक ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास एपीआय भोसले करीत आहेत.