प्रभागसंघाच्या व्यवस्थापिकेकडून ३१ लाखाचा अपहार

चौकशी सुरू : सुनावणीला गैरहजर, संगनमताने प्रकार झाल्याची माहिती

रत्नागिरी:- शहराजवळच्या एका गावामध्ये प्रभाग संघाच्या माध्यमातून सुमारे ३१ लाखाचा अपहार झाल्याचे पुढे आले आहे. महिला सबलीकरणाच्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रभाग संघांना अर्थसाहाय्य केले जाते. या संघांच्या माध्यमातून महिला बचतगटांना किंवा महिलांना वैयक्तीक आर्थिक मदत केली जाते. तेही सुलभ हप्त्यात परत फेडण्याच्या बोलीवर; परंतु शहरालगतच्या एका प्रभागसंघाच्या व्यवस्थापिकेने परस्पर पैसे काढून ३१ लाखाचा अपहार केल्याची चौकशी सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक असे ५२ प्रभाग संघ स्थापन करण्यात आले आहेत. किरकोळ उद्योग किंवा वैयक्तिक आर्थिक मदत करून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या संघांचा मुख्य उद्देश आहे. सावकारांच्या जंजाळात अडकण्यापेक्षा प्रभाग संघाला प्रस्ताव देऊन त्यांच्यामार्फत ही आर्थिक मदत मिळवली जाते. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणेंतर्गत या संघांची स्थापना झाली आहे. जिल्ह्यातील अनेक संघ किंवा बचतगट उत्तम काम करत आहेत; परंतु रत्नागिरी लगतच्या एका गटामधील प्रभाग संघामध्ये हा ३१ लाखाचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे.
अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काहींनी पोबारा केला आहे तर काही अधिकारी आम्ही त्या काळात नव्हतो अशा पवित्र्यात आले आहेत. २०२१-२२ मध्ये तपासणी संबंधित प्रभाग संघाची तपासणी करण्यात आली होती. एक, दोन नव्हे तर पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी ही तपासणी केली तरी दोन वर्षे त्यांना हा अपहार दिसून आला नाही. याबाबत आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे समजते. सुरवातीला संबंधिताने प्रभाग संघाच्या खात्यावरील ५ लाख रुपये परस्पर काढले. त्यामुळेच अपहाराची रक्कम ही आता ३१ लाखावर जाऊन पोहोचली आहे. या अपहार प्रकरणाचा बोलबाला सर्वत्र होऊ लागल्यानंतर काहींनी कागदावर दाखवण्यासाठी तातडीची सुनावणी लावली; मात्र या सुनावणीकडे प्रभाग व्यवस्थापक महिलेने पाठ फिरवली. अपहार झाला आहे हे माहिती असूनही संबंधित व्यवस्थापक महिला सुनावणीला हजर न राहिल्याने या अपहार प्रकरणाला अधिक दुजोरा मिळाला होता. हा अपहार उघडकीस आल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे.

या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी विविध पदे कार्यान्वित झाली आहेत. प्रकल्प संचालकांसह जिल्हा कृती संघ समन्वयक, जिल्हा समन्वयक अशी विविध पदे अस्तित्वात आली आहेत; मात्र जिल्ह्यातील किती प्रभागांना पदे उपभोगणार्‍या अधिकार्‍यांनी भेटी दिल्या याची माहिती मात्र कोणाकडेच नाही. हा अपहार संगनमतानेच झाला असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. खोटी कागदपत्रे रंगवायला मदत कोणी केली तसेच स्थानिक पातळीवर झालेल्या तपासणीत कोणी दुर्लक्ष केलेय असे अनेक प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत.(रत्‍नागिरी एक्सप्रेस वृत्त)

रत्नागिरीतील तालुक्यातील एका प्रभाग संघामध्ये सुमारे ३१ लाखाचा अपहार झाल्याची तक्रार आहे. याबाबत माझ्याकडेही काही तक्रारी आल्या आहेत. मी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये चौकशी अहवाल मिळेल. त्यानंतर यामध्ये कोण कोण दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

  • कीर्तीकुमार पुजार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी