रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावर भरधाव वेगात असलेल्या ओम्नी गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात ओम्नी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ०२ मे रोजी सायंकाळी ७.४० च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुनील सुरेश तोसकर (३६, रा. गोळप, शिरंबाडवाडी) हे त्यांची दुचाकी शिरंबाडवाडी फाट्यावर रस्त्याच्या बाजूला उभी करून रत्नागिरीहून पावसकडे जाणाऱ्या महामार्गावरून रस्ता ओलांडत होते. रस्त्याच्या मधोमध आले असताना, रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या ओम्नी गाडी (एमएच/०६/ए.बी./८४६९) ने त्यांना जोरदार धडक दिली. या ओम्नी गाडीचा चालक अरविंद शिवराम गुरव (वय ५०, रा. सापुचेतळे, वाडीलिंबू, वाघ्रट, ता. लांजा) हा निष्काळजीपणे गाडी चालवत होता, असे फिर्यादी प्रशांत गोविंद लोहळकर (पो.ना./७१८, पूर्णगड सागरी पोलीस ठाणे) यांनी सांगितले.
अपघातामध्ये पादचारी सुनील तोसकर यांच्या डोक्याला, डाव्या हाताला, डाव्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी ओम्नी चालक अरविंद गुरव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे सुनील तोसकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ओम्नी गाडी ताब्यात घेतली असून, पुढील तपास करत आहेत.









