पीक विमा योजना; शेतकरी संख्येत वाढ मात्र विमा क्षेत्रात घट

रत्नागिरी:-  हवामानात होणार्‍या बदलांचा आंबा, काजू उत्पादनावर मोठ्याप्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदारांना पिक विमा योजना निश्‍चित लाभदायक ठरु शकते. गेली चार वर्षे शेतकर्‍यांचा प्रतिसाद संमिश्र आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील 24 हजार 306 बागायतदारांनी 14 हजार 788 हेक्टरवरील बागांचा विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावणेचार हजार शेतकरी वाढले असले तरीही विमा उतरवलेले क्षेत्र घटले आहे.

वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी शासनाने अवेळी पाऊस आणि कमाल तापमान यावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली. यंदा 2020-21 या वर्षांकरीता विमा उतरवण्यासाठी नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत होती. जिल्ह्यातील 21 हजार 017 आंबा तर 3,289 काजू बागायतदारांनी विमा उतरवला. त्यात कर्जदार बागायतदारांची संख्या 22 हजार 514 आणि बिगर कर्जदार 1,792 बागायतदार आहेत. शासनाच्या निकषानुसार शेतकरी हिस्स्यापोटी 9 कोटी 84 लाख 19 हजार 886 रुपये भरण्यात आले. शेतकरी, शासन आणि विमा कंपनी मिळून 196 कोटी 83 लाख रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.

आंबा, काजूसाठी पिक विमा योजना 2016-17 या वर्षात सुरु झाली. पहिल्या वर्षी 15 हजार 069 शेतकर्‍यांनी विमा उतरवला. विमा योजनेचा लाभ घेण्याची कोकणातील शेतकर्‍यांची मानसिकता नाही. तरीही पहिल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने काही बागायतदारांनी त्यामधून काढता पाय घेतला. 2017-18 ला लाभार्थी संख्या हजाराने घटली. 2019-20 ला त्यात मोठी वाढ झाली. या वर्षी विमा उतरवलेल्या शंभर टक्के आंबा बागायतदारांना परतावा मिळाला. 18 हजार 158 शेतकर्‍यांना 84 कोटी 33 लाख रुपये मिळाले. 2020-21 च्या हंगामाच्या सुरवातीला वातावरणाने रंग दाखवल्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल असा अंदाज आहे. उत्पन्न घटले तर ते भरुन काढण्यासाठी बागायतदारांना विमा परतावा आधार ठरु शकतो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावणे चार हजार बागायतदारांनी अधिक विमा उतरला आहे; परंतु क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत दीड हजार हेक्टरने घटले आहे. गतवर्षी काजू बागायतदारांना म्हणावा तसा लाभ झालेला नव्हता. त्यामुळे तुलनेत यंदा काजू व्यावसायिकांची संख्या कमी झाली आहे.