रत्नागिरी:- पावसाळ्यापूर्वीची कामे तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीठी कोकण विभागातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जीवरक्षक बोटी, जॅकेटस् व इतर सामुग्रीही उपलब्ध आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) तुकडी चिपळूण येथे तैनात केली जाणार असल्याचे कोकण आयुक्तांनी बैठकीत सांगितले.
कोकणात जून ते सप्टेंबरपर्यंत मॉन्सून असतो. या काळात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी प्रशासनाला खूप अगोदरपासून तयारी करावी लागते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. यामध्ये कोकणातील परिस्थितीची माहीती घेतली. तसेच आवश्यक त्या उपाययोजनाही सूचविल्या. कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई शहर, उपनगर, ठाणे,रायगड, पालघर या जिल्ह्यांचा खरीप पूर्व कामांचा आढावा सादर केला.
पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे. तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी. हवामान विभागाकडून पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळाली पाहिजे. त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल. या काळात समुद्रात दूरवर जाऊन मासेमारी करणार्या बोटींशी संपर्क असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पूर्वतयारी केली आहे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्यांचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यन्वीत आहेत.
कोकणात 2020 मध्ये 3 हजार 173 मिमि पाऊस झाला. विभागात 371 पूर प्रवण आणि 223 दरडग्रस्त गावे आहेत. आवश्यक तेथे जीवरक्षक बोटी, जॅकेट व अन्य साहित्य सज्ज आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी चिपळूण येथे तैनात केली जाईल. त्यासाठी मॉकड्रीलही झाले आहे. कोकणात नवीन रडार उभारण्यात येत असून हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण व अचूक मांडता येईल. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नव्हता. पण 2017 पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग सारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नूकसान केले. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मे मध्ये जास्त असतो. नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे आता शक्य आहे.
गतवर्षी तिवरे धरणाची दुर्घटना घडली. यंदा तसे होवू नये यासाठी कोकणातील धरणांची देखभाल व दूरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. धरणाजवळील गावातील लोकांना सावध करावे. नैसर्गिक आपत्तीत त्यांना सुरक्षित जागी स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, अशा सुचना आढावा दिल्या.









