पाच, सहा डझनचे फळ पेटीला; उर्वरित कॅनिंगला

हापूसची स्थिती; आवक वाढल्यामुळं दरावर परिणाम

रत्नागिरी:-बागायतदारांच्या अंदाजानुसार शेवटच्या टप्प्यात हापूसची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. सर्वसामान्यांना परवडेल असे फळ मिळत असल्यामुळे बाजारामध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. पाच, सहा डझनचे फळ बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून छोटी आणि डागी फळं कॅनिंगला दिली जात आहे. उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचा दर सर्वसाधारण किलोला ३४ रुपयांपर्यंत मिळत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात झालेली घट, हंगामाच्या सुरवातीला वाढलेली मागणी यामुळे फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा बाजापेठेत एक वेगळाच तोरा होता. उत्पादन घटल्यामुळे यंदा सर्वसामान्यांना चव चाखायला मिळणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. व्यापार्‍यांनी वर्तवलेला अंदाज अखेर खरा उतरला आहे. एप्रिलनंतर तिसर्‍या मोहराचे उत्पादन वाढेल असा अंदाज अक्षयतृतेया दरम्यानच वर्तवण्यात आला होता. त्यानुसार उत्पादनात वाढ झाली असून मागणी ही घटली आहे. त्यामुळे १ डझन आंब्यासाठी ग्राहकांना १ हजाराहून अधिक रुपये मोजावे लागत होते. पण आता आवक वाढल्याने डझनभर आंब्यासाठी १५० ते ४०० रुपयेच मोजावे लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळतेय हे महत्वाचे. शिवाय दर कमी झाल्याने कोकणातील आंबा उत्पादकांनी माल मार्केटमध्ये पाठवण्याऐवजी जागेवरच कंपन्यांना विकण्यास प्राधान्य दिले आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई मार्केटमध्ये हापूसची आवक सुरु झाली होती. त्यानुसार दिवसाकाठी ९० हजार पेट्यांची आवक सुरु होती. मात्र, पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी अवस्था झाल्याने दर घटले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूसची एक पेटी ही ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात होती. आता आवक वाढल्याने हीच पेटी १ हजार ते २ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी थेट ज्यूस बनवणार्‍या कंपन्यांना जागेवर आंबा विक्रीला प्राधान्य दिले आहे.