पाचवी, आठवीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक

शालेय शिक्षण धोरणात महत्वाचा बदल; एप्रिल महिन्यात होणार परीक्षा

रत्नागिरी:- राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात बदलाचे वारे सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता इ. पाचवी आणि आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षेत पास होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवीचे 16 हजार 500 आणि आठवीचे 18 हजार 700 विद्यार्थ्यांना आता पास होण्यासाठी अभ्यासच करावा लागणार आहे. एप्रिलमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यात 2010-11 पासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आली. त्यानुसार मूल्यमापनामध्ये ’ड’ श्रेणी मिळालेल्या अथवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र सहज पास केले जात असल्याने नापास होण्याची भीती राहिली नव्हती. त्यातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसले. तसेच विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश द्यायचा असल्याने त्यांना मागील वर्गातील अध्ययन कौशल्य अपेक्षित प्रमाणात मिळाली नसली तरी त्यांना पुढील वर्गात प्रवेश श्रेणी मिळालेल्या अथवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र सहज पास केले जात असल्याने नापास होण्याची भीती राहिली नव्हती. त्यातून विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसले.

तसेच विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रवेश द्यायचा असल्याने त्यांना मागील वर्गातील अध्ययन कौशल्य अपेक्षित प्रमाणात मिळाली नसली तरी त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा लागत होता. त्यातून मुलांच्या पुढील अध्ययनात अडथळा येत असे.
या पार्श्वभूमीवर आता इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे.

या परीक्षेत नापास झाल्यास त्यांच्यासाठी वाढीव तासिका घेऊन निकालानंतर दोन महिन्यांमध्ये पुनः परीक्षा घेतली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
पाचवीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग 1, भाग 2 तर आठवीसाठी प्रथम, द्वितीय, तृत्तीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, असे विषय आहेत. पाचवीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तोंडी, प्रात्यक्षिकासाठी 10 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 40 असे एकूण 50 गुण, तसेच आठवीसाठी तोंडी परीक्षेसाठी 10, आणि लेखीसाठी 50 अशी 60 गुणांची परीक्षा होणार आहे, एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर परीक्षेत नापास विद्यार्थ्यांसाठी जुनमध्ये पुनः परीक्षा होईल, असे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.