Thursday, June 18, 2026
spot_img
Home राजापूर पाचल येथे गॅस कार्डांची साठेबाजी केल्याप्रकरणी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल

पाचल येथे गॅस कार्डांची साठेबाजी केल्याप्रकरणी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल

पाचल:- तालुक्यातील पाचल येथील ‘श्री सद्गुरु गॅस सेवा’ या दुकानावर तहसीलदारांच्या भरारी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १०९४ ग्राहक गॅस कार्ड आणि व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आले असून, दुकान मालकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​राजापूरचे तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख श्री. विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निलेश सतीश लाड आणि लिपिक विक्रम पाटील यांचे पथक पाचल परिसरात गॅसच्या अवैध वापराबाबत तपासणी करत होते. १ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास या पथकाने विलास भिकू कोलते यांच्या ‘श्री सद्गुरु गॅस सेवा’ (एच.पी. गॅस एजन्सी) या दुकानाची झडती घेतली.

​तपासणी दरम्यान पथकाला दुकानामध्ये ​भारत गॅस कंपनीचा १ रिकामा व्यावसायिक सिलेंडर,
​एच.पी. कंपनीची तब्बल १०९४ ग्राहक गॅस कार्ड हे साहित्य अनधिकृतपणे साठवून ठेवल्याचे आढळले. जेव्हा पथकाने या मोठ्या प्रमाणावरील गॅस कार्डां बाबत आणि दुसऱ्या कंपनीच्या सिलेंडरबाबत मालक विलास कोलते यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. हे सर्व साहित्य साठेबाजीच्या उद्देशाने अनधिकृतपणे ठेवल्याची खात्री पटल्याने पथकाने ते जप्त केले.

तहसीलदार विकास गंबरे यांच्या आदेशानुसार, पुरवठा निरीक्षक निलेश लाड यांनी २३ एप्रिल रोजी रात्री राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार विलास भिकू कोलते (वय ५५, रा. रायपाटण) याच्यावर कलम जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.