दोन मित्र गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक परशुराम घाटात एका भरधाव कारच्या भीषण अपघातात अहिल्यानगर (अहमदनगर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. विसावा पॉईंटजवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश प्रकाश मंडलिक (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांचा मामेभाऊ रोहित संतोष भालेकर (वय २८) हा आपल्या मित्रांसोबत महिंद्रा एक्स.यु.व्ही ३०० (MH 15 JH 0516) कारने कोकणात येत होता. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास ही कार परशुराम घाटातील विसावा पॉईंटजवळ आली असता हा भीषण अपघात झाला.
संशयित आरोपी चालक प्रतीक संजय भंडारे (वय २८, रा. इंदिरानगर, जि. अहिल्यानगर) याने आपली कार भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवली. घाटातील रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवरील ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला. या अपघातात रोहित संतोष भालेकर याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात कारमधील अन्य प्रवासी संदीप चंद्रभान ढेरिंगे आणि कृष्णा संपत आव्हाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये कारचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
याप्रकरणी खेड पोलिसांनी कार चालक प्रतीक भंडारे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परशुराम घाटातील वळणांवर वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.









