परतीच्या पावसाचा सलग तिसऱ्या दिवशी दणका 

रत्नागिरी:– गेले तीन दिवस शेतकर्‍यांची झोप उडवणार्‍या पावसाने मंगळवारी दुपारपर्यंत उघडीप दिली; मात्र दुपारनंतर आभाळ भरुन आल्यामुळे पुन्हा कापलेले भात वाचवण्याची कसरत बळीराजाला करावी लागणार आहे. हवामान विभागाकडून 17 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असून जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही दिलेला आहे.

मंगळवारी (ता. 13) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 5.00 मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 12.40, दापोली 5.20, खेड 5.50, गुहागर 6.00, चिपळूण 11.60, संगमेश्‍वर 2.00, रत्नागिरी 0.30, लांजा 1.30, राजापूर 0.70 मिमी नोंद झाली. 1 जुनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2,690 मिमी पाऊस झाला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पावसाचा जोर ओसरला आणि कडकडीत उन पडले. दुसर्‍या आठवड्या परतीच्या पावसाचा धुमाकुळ अचानक सुरु झाला. अनेक शेतकर्‍यांनी भात कापून सुकवण्यासाठी मळ्यातच ठेवलेेले होते. ढगफुटीप्रमाणे पडलेल्या पावसाचा सर्वाधिक तडाखा दक्षिण रत्नागिरीला बसला. लांजा, राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर तालुक्यातील शेकडो एकरची भातशेती झोपली. शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग पाऊस सुरु होता. मंगळवारी उघडीप मिळताच पावसाचे पुन्हा सावट निर्माण झाले आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण असून पाऊसही सुरु झाला. ढगांच्या गडगडाटासह पडणार्‍या पावसाने शेतकर्‍यांचा धक्का बसला आहे. सकाळी उन पडल्यामुळे अनेकांनी भात गोळा करण्यास सुरवात केली होती. तिन दिवस पावसात भिजल्याने लोंबी काळी पडली असून उत्पादनावर परिणाम होणार आहे. 16 आणि 17 ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे तयार झालेले भात पिक वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.