रत्नागिरी:- शहरातील परटवणे येथील फिनीलेक्स कॉलनीजवळील वळणात ओव्हरटेक करणार्या ट्रकची समोरुन येणार्या दुचाकीला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 11.45 वा.सुमारास घडली आहे.
अयान सईद साखरकर (22, रा. साखरतर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. रविवारी दुपारी अयान आपल्या ताब्यातील एव्हीएटर दुचाकी ( एमएच-08-एएफ-1703) घेउन साळवीस्टॉप ते परटवणेमार्गे साखरतरला आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास दिलावर सोलकर हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-एपी-5677) घेउन परटवणे ते साळवीस्टॉप भरधाव वेगाने जात होता. ही दोन्ही वाहने फिनोलेक्स कॉलनी जवळील वळणात आली असता दिलावर सोलकरने आपल्या पुढील डंपर (केबी-28बी-9256) ला ओव्हरटेक करत असताना पुढून येणार्या अयानच्या दुचाकीला धडक देत हा अपघात केला. या अपघातात दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला असून गंभिर जखमी झालेल्या अयानचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. तसेच मृताचे नातेवाईक आणि साखरतर येथील नागरिकांचा घटनास्थळी मोठा जमाव गोळा झाला होता. संतप्त जमाव अयानचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत होता. या जमावामुळे तेथील वाहतुकही काही काळ खोळंबली होती. परंतू पोलिसांनी जमावाची समजूत काढून अपघाताचा पंचनामा केल्यानंतर अयानचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सायंकाळी अयानचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.









