नेटवर्क नाही, तर मतदान नाही; तळवडे ग्रामसभेत निवडणुकीवर बहिष्काराचा ठराव

स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; आक्रमक ठराव मंजूर

चिपळूण:- “आमच्या भावना समजून घ्या, नेट द्या आणि मत घ्या,” अशा आशयाचे बॅनर लावून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या तळवडे गावाने आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. १९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत मोबाईल नेटवर्कच्या प्रश्नावरून ग्रामस्थ कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. गावात नेटवर्कची सुविधा तातडीने उपलब्ध न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

तालुक्याच्या टोकास वसलेल्या तळवडे येथे अद्याप मोबाईल यंत्रणा नाही. परिणामी संपर्काचे साधन नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावात आजही मोबाईल सिग्नल नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ऑनलाईन कामांसाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामसभेने प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. गावात तातडीने मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा संपूर्ण गाव येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असा ठराव एकमताने करण्यात आला.

या ठरावांची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे. याआधी पाठवलेली सर्व निवेदने आणि मागण्या एकत्र करून केंद्र सरकारकडे लेखी स्वरूपात पाठवण्यात येणार आहेत. यासाठी सर्व दस्तऐवज इंग्रजीत तयार करण्यात येणार आहेत. गावाच्या हक्कासाठी आता एक गाव- एक ठराव- एक आवाज” या बाण्यावर ग्रामस्थ एकत्र आलेते. पुढील काळात आंदोलक रूप धारण करण्याचीही तयारी असल्याचे ग्रामसभेतून दिसून आले.