प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; मिरकरवाडा बंदराला भेट
रत्नागिरी:- ‘तौक्ते’ चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांशी संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शासनाकडून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. मिरकरवाडा येथील बंदरावरील काही नौकांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली.
वादळामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पटोले कोकण दौर्यावर आले आहेत. रत्नागिरीत त्यांनी मिरकरवाडा येथील मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे बाबामियाँ मुकादम यांनी नाना पटोले यांच्यापुढे समस्या मांडल्या. या वेळी माजी खासदार हुसैन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, अविनाश लाड, माणिकराव जगताप, प्रदेश सरचिटणीस रमेश किर, हारिस शेकासन, शब्बीर भाटकर, मार्तंड नाखवा, दीपक राऊत, निसार दरवे, निसार बोरकर, अश्विनी आगाशे, सुश्मिता सुर्वे, रूपाली सावंत आदी उपस्थित होते.
चक्रीवादळामुळे शेकडो नौका मिरकरवाडा बंदरातच उभ्या आहेत. एकमेकाला लागून असल्यामुळे नौकांचे नुकसान झाले आहे. अनेक मच्छीमारांची जाळी फाटली आहेत. सध्या मासेमारी बंद असल्यामुळे नौकांची दुरुस्ती करणेही अशक्य आहे. बँकांचे हप्ते यासह कुटुंब चालवण्याचे मच्छीमारांपुढे आव्हान आहे. या परिस्थितीत सरकारने हात दिला तर फायदा होईल, अशा मागण्या मच्छीमारांनी पटोले यांच्यापुढे मांडल्या.
मच्छीमारांबरोबर चर्चा केल्यानंतर किती नौकांचे नुकसान झाले आहे, नुकसानीचे स्वरूप कसे असते, हे पाहण्यासाठी पटोले पदाधिकार्यांबरोबर बंदरावर उभ्या असलेल्या नौकांमध्ये उतरले. जेटीवरून पाहणी करून काहीच समजणार नाही. प्रत्यक्षात नौकांना कसा फटका बसला हे पाहिल्यावरच समजू शकेल, या उद्देशाने काही नौका त्यांनी पाहिल्या. प्रत्यक्ष भेटीमुळे मच्छीमारांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.