निवडणूक उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह राजापूर, गुहागर तहसीलदार यांच्या बदल्या

रत्नागिरी:-जिल्ह्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह राजापूर आणि गुहागरच्या तहसीलदार यांच्या बदल्या झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त जागांवरही तहसिलदारांची नियुक्ती शासनाने केली आहे.

बदल्यांचे हे आदेश नुकतेच काढण्यात आले. त्यात सिंधुदुर्ग च्या उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रोहिणी राजपूत या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी ( निवडणूक ) म्हणून रुजू होणार आहेत. सुशांत बनसोडे यांच्या बदलीने हे पद रिक्त होत आहे. तर बनसोडे यांची उपविभागीय अधिकारी कागल राधानगरी येथे बदली झाली आहे. राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांची गुहागर तहसीलदार म्हणून बदली झाली आहे तर ठाणे येथून शीतल जाधव या राजापूरच्या तहसीलदार म्हणून नियुक्त होतील. गुहागरच्या तहसीलदार लता धोत्रे यांची तहसीलदार म्हणून धारावी येथे बदली झाली आहे. खालापूर, रायगडचे तहसीलदार आय. जी. चप्पलवार यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (सामान्य प्रशासन) या रिक्त पदावर बदली झाली आहे. तर सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत रजा राखीव तहसीलदार म्हणून बदली झाली आहे.