नावेद-२ चा सोनार यंत्रणेद्वारे होणार तपास

संजय मोहिते; दाभोळ समुद्रात नौका बुडाल्याचा अंदाज

रत्नागिरी:- समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छीमारी नौकेचा शोध तपास लागेपर्यंत सुरू ठेवला जाईल. प्राथमिकदृष्या ही नौका बुडाल्याचा अंदाज आहे. गुहागर- दाभोळ समुद्रात ही नौका बुडाली असून ज्या ठिकाणी बुडाल्याची शक्यता आहे, त्या दोन किमी परिसरामध्ये नौदलाचीही मदत घेणार सोनार (साऊंड नेव्हिगेशन ण्ड रेजिनिंग) प्रणालीचा उपयोग करून बुडालेली नौका कुठे आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. संशयास्पद जहाजावरही आमची नजर असून ते गोव्यात आहे, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

जयगड येथील नावेद-२ नौका बेपत्ता होऊन महिना झाला, तरी अजून या नौकेबाबत कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. एका मालवाहू जहाजाची धडक बसून ही नौका बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नौका बुडाली असेल तर काही तरी अवशेष पाण्यात तरंगताना दिसायला हवेत ते दिसत नाहीत. त्यातील एकच मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे या नौकेचे अपहरण झालेले नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली. पोलिसांना तपासात काही धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच त्याचा तपास होईल.

याबाबत मोहिते म्हणाले, जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छीमार नौकेचा शोध सुरु आहे. नौका कुठल्या भागात बुडाली हे ही आता निश्चित झाले आहे. नौकेवरचा जीपीएस सुरु असता तर आपल्याला ही माहिती मिळाली असती. मात्र त्या नौकेवरचा जीपीएस सुरु नव्हता. जी दुसरी नौका होती तिचा जीपीएस आम्ही घेतला आहे पण एकाचा जीपीएस घेऊन भागणार नाही. दुसरी नौका कुठे होती हे ही तपासणे महत्वाचे आहे. सध्या ती गोव्यात आहे.

अशी काम करते यंत्रणा

नौदलाची सोनार ही यंत्रणा समुद्रातील खोल पाण्यातील जहाजाचे जुने अवशेष, वस्तू आदी शोधण्यासाठी वापरली जाते. नौदलाच्या जहाजाच्या तळाशी ही यंत्रणा असते. त्यातून एका बाजूने ध्वनिलहरी सोडल्या जातात. त्या खालील वस्तूवर आदळुन परत दुसऱ्या यंत्रावर येऊन आदळतात. तेथे नमके काय आहे, याचा अंदाज येतो.