रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गुरववाडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेले चार दिवस बेपत्ता असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील रस्त्याच्या खाली असलेल्या नाल्याच्या पाईपमध्ये संशयास्पद स्थितीत मिळून आला आहे. विजय तान कांबळे (वय ६०, रा. नाणीज बौद्धवाडी) असे मृत वृद्धाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय कांबळे हे नाणीज येथील त्यांच्या घरी एकटेच राहत होते. त्यांच्या पत्नी आणि मुलांचे मुंबई येथे वास्तव्य होते. विजय कांबळे यांना दारूचे अति प्रमाणात व्यसन होते. २४ ऑक्टोबरपासून विजय कांबळे यांचा त्यांच्या पत्नीशी संपर्क तुटला. त्यांची पत्नी विशाखा विजय कांबळे यांनी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागत नव्हता आणि नंतर तो बंद स्थितीत येत होता.
पतीचा फोन बंद असल्यामुळे विशाखा कांबळे यांनी मुंबईतून नाणीज येथील शेजारी दीपक गरव यांना फोन करून चौकशी केली. दीपक गरव यांनी घरी जाऊन पाहिले असता, घर बंद असून त्याला कुलूप लावलेले आहे, अशी माहिती त्यांनी विशाखा यांना दिली. त्यानंतर विशाखा यांनी त्यांचा भाचा स्वप्नील साळवी (रा. देवळे) यास नाणीज येथे जाऊन खात्री करण्यास सांगितले. स्वप्नील साळवी यांनी गावात चौकशी केली असता विजय कांबळे यांचा पत्ता लागला नाही.
मयत कांबळे यांच्या पत्नी, खबर देणार आणि इतर नातेवाईक दि. २४ ऑक्टोबर पासून त्यांचा शोध घेत असताना, दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास धक्कादायक बाब समोर आली. मयत विजय कांबळे यांच्या घराच्या अगदी जवळच असलेल्या रेवाळे वाडी आणि गुरववाडीकडे जाणाऱ्या तिठ्यात रस्त्याच्या खालील नाल्याच्या पाईपमध्ये एका पुरुष जातीचे प्रेत आढळून आले. ते प्रेत विजय तान कांबळे यांचेच असल्याचे नातेवाईकांनी खात्री केली.
ही घटना दि. २४ ते दि. २८ ऑक्टोबर रोजी १२.०० वाजेपर्यंतच्या मुदतीत घडली असून, घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आमृ. क्रमांक ८५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.









