नवीन भाजी मार्केट मधील 20 गाळेधारकांना न्यायालयाकडून दिलासा नाही

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बा.ना. सावंत मार्ग येथील नवीन भाजी मार्केट इमारतीतील 20 गाळेधारकांना जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. इमारत धोकादायक झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेने भाडे कराराने दिलेले या इमारतीतील गाळे खाली करण्याची नोटीस दिली होती. या नोटीसची अंमलबजावणी होवू नये म्हणून गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपिल करून नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची विनंती केली होती. त्यांचा हा विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी सह दिवाणी न्यायालयानेही स्थगितीची मागणी फेटाळली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने अ‍ॅड.निलांजन नाचणकर यांनी काम पाहीले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची नवीन भाजी मार्केटची इमारत सुमारे 40 वर्षे जुनी असून त्या इमारतीचे तीन वर्षांपूर्वी केबीपी सिव्हील इंजिनिअरिंग कंपनीकडून स्ट्रक्चरल ऑडिट झाले. यामध्ये ही इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचा अहवाल रनपला प्राप्त झाला. त्यानंतर रनपने या इमारतीतील गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे ताब्यात देण्यास सांगितले. नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात अंमलबजावणी न झाल्यास गाळे ताब्यात घेवून त्यासाठी झालेला खर्च वसूल केला जाईल, असा नोटीसद्वारे इशारा देण्यात आला. या नोटीसच्या कार्यवाहिला स्थगिती मिळावी यासाठी 20 गाळेधारकांनी सहदिवाणी न्यायाधिश ‘क’स्तर न्यायालयात धाव घेतली.सहदिवाणी न्यायालयाने त्या नोटीसला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपिल करून नोटीसला स्थगिती देण्यास विनंती केली. योग्यती कायदेशीर प्रक्रिया न करता नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे रनपकडून गाळ्यांचा कब्जा घेतला जाऊ नये. त्याचबरोबर इमारत पाडली जावू नये अशी ताकीद देत स्थगिती देण्याची विनंती जिल्हा न्यायालयाला करण्यात आली होती. परंतु जिल्हा न्यायालयाने गाळेधारकांचा अपिल अर्ज फेटाळून लावला. रनपच्या बाजूने अ‍ॅड.निलांजन नाचणकर यांनी काम पाहिले. आता रनपने ही इमारत पाडून तिथे नवीन इमारत बांधण्याचा ठराव गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत केला आहे. येत्या चार-पाच महिन्यात सहदिवाणी न्यायालयातील निकालानुसार केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याबाबतचे नियोजन केले जावू शकते. कोरोना संकटामुळे या न्यायालयातील निकाल लांबणीवर पडला असला तरी येत्या चार महिन्यात निकालाची अपेक्षा आहे.

नवीन भाजी मार्केटमधील गाळे विलास साळवी, तुषार भानुशाली, सुरेश शेट्ये, नजीर काझी, सनी आहुजा, देवदास आहुजा, मंगेश मयेकर, स्मिता साळवी, विनोद वरदे, बंडोपंत भोळे, सुनिल फणसाळकर, बंडू पाटील, श्यामराव पाटील, संदेश नार्वेकर, श्रीकृष्ण जाधव, अब्दुल मजगांवकर, राजेंद्र कदम, राहुल शेरवाळे, रेखा नार्वेकर यांनी भाडे कराराने घेतलेले आहेत. या भाडे कराराचा करारनामा संपुष्टात आला आहे. त्याचबरोबर याच इमारतीतील इतर काही गाळेधारकांनासुद्धा रनपने अशाच नोटीस बजावल्या आहेत. त्यातील काही गाळेधारक स्वतंत्रपणे न्यायालयात गेले आहेत.