चिपळूण:- विकासकामांसाठी भाजपला साथ दिली. पण कामे झालीच नाहीत. उलट माझी कामे अडवून ठेवली गेली. पक्षांतील वरिष्ठांच्या कानावर मी सर्व घातले, पण काही उपयोग झाला नाही, म्हणून मी भाजपातून बाहेर पडत आहे, अशी घोषणा नगरसेविका सीमाताई रानडे यांनी रविवारी केली. यामुळे चिपळूण शहर भाजपला पालिकेत मोठा धक्का मनाला जात आहे.
अजूनही विकासकामे करण्यासाठी कितीही लढावे लागले तरी चालेल पण लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही, असेही सिमाताई म्हणाल्या. २०१६ मध्ये नगरपालीका निवडणूक झाली. तेव्हा मी भारतीय जनता पक्ष जिल्हा अध्यक्षांकडे तिकीट मागितले होते. पण मला तिकीट दिले गेले नाही. म्हणून मी अपक्ष निवडणूक लढले आणि निवडूनही आले. यापूर्वी २०११ साली मी भाजपाची महिला अध्यक्षा असूनही मला तिकीट दिले नव्हते. तेव्हाही मी ४ प्रभागातून चांगले मताधिक्य घेतले पण विजयी होता आले नाही. २०१६ साली अपक्ष म्हणून निवडून आल्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष माझ्या घरी आले आणि त्यांनी मला नगर पालीकेत भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली. प्रभागातील विकासकामे करूया असा शब्द दिला. पहिल्यापासून भाजपच्या विचाराची असल्याने मी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले. परंतु माझ्या प्रभागातील कामे व्हावीत, रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी मी पाठींबा देत आहे, असेही सांगितले. अनेक कामे सभापती असताना लेखी स्वरूपात दिली होती. पाठपुरावाही करत होते, पण जाणूनबुजून माझी कामे होऊ दिली नाहीत. अनेकवेळा विनंती करूनही रस्ते होऊ दिले जात नव्हते. २०२१मध्ये चिपळूणमध्ये पुन्हा सर्वसाधारण महिला आरक्षण पडले तर नगराध्यक्ष पदासाठी मी स्पर्धेत येईन म्हणून माझे पर छाटण्याचे प्रयत्न सतत केले गेले. या सगळ्याला कंटाळून मी सभापती पदाचा राजीनामा देत होते, पण काही सहकारी नगरसेवकांनी समजावले म्हणून मी तेव्हा असे पाऊल उचलले नाही. माझ्या प्रभागाची कामे होण्यासाठी भाजपलाच पाठींबा दिला होता. पण माझा आणि प्रभागातील लोकांचाही भ्रमनिरास झाला. माझी कामे जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आली. या सगळ्याचा वीट आला होता, पण मार्ग दिसत नव्हता. कामे होत नव्हती म्हणून अनेक नगरसेवकही कंटाळले होते. म्हणूनच पालिकेचे महाविकास आघाडी स्थापन झाली. वडनाक्यातील, सोनार आळीतील रस्ता हॉटमिक्समध्ये करून मिळावा, अशी नागरीकांची आणि माझी मागणी होती. कारण तिथे पाणी भरते. परंतु तो रास्ता जाणीवपूर्वक कोल्डमिक्समध्ये करण्याचे ठरवले गेले आणि निकृष्ट प्रतीचा माल घेत असल्याने नागरिकांनी ते काम थांबवले. समर्थ कृपा ते राऊत आळी रस्ता, नवा भेरी मंदिर ते जुना भेरी मंदिर रस्ता, स्वामी मठ ते रामतीर्थ पर्यंतचा रस्ता आशा रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. कितीही पाठपुरावा केला तरी हे रस्ते होऊनच द्यायचे नाहीत, कामे जाणूनबुजून होऊनच द्यायची नसतील तर वेळीच निर्णय घेणे आवश्यक आहे. मला नागरिकानी कामे करण्यासाठी अपक्ष निवडून दिले आहे. मी वर्षभर पाठपुरावा करून काही कामे करून घेतली आहेत. पण महत्त्वाचे रस्ते चार वर्षे अडवून ठेवले गेले. आता मला मार्ग बदलावा लागेल. मी जो भाजपला पाठिंबा दिला होता तो आता मी काढून घेत आहे, असे सीमा रानडे म्हणाल्या. याचे शल्य आहे. कारण वर्षनुवर्षं ज्या पक्षाचे काम केले, त्याच पक्षात अनेकदा अन्याय सहन केला. एक सामान्य महिला असूनही मित्र-मैत्रिणीच्या सहकार्याने ज्येष्ठांच्या आशीर्वादाने कामे घेण्यासाठी झटत राहिली, आता त्या पक्षाला सोडताना दुःख तर होणारच, पण नाईलाज आहे. मी या पुढेही कामे होण्यासाठी झटत राहणार आणि नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे, असे रानडे म्हणाल्या.









