दोन वर्षांनी होणाऱ्या शिक्षक बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी व पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळणार आहे. जिल्ह्यातील ७ हजार शिक्षकांची माहिती अपलोड होणार आहे. शुक्रवारपासून (ता. १०) ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहेत. २०२२ मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या प्रणालीचे अनावरण मुश्रीफ यांच्या हस्ते गुरुवारी मंत्रालयात करण्यात आले. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचार्‍यास किमान पाच वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षिका, परित्यक्ता तसेच वयाने ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी, त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रीकरण आदींचा विशेष संवर्ग शिक्षकांत समावेश केला आहे. शिक्षक संवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामविकास विभागाच्या ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयाद्वारे बदलीचे सुधारित धोरण निश्चित केले आहे. यात विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना येणार्‍या अडीअडचणी आदी विचारात घेण्यात आल्या.

जिल्हांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र आणि शाळांची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे.