दोन नौकांवर सापडली १४ हजार किलो तारली

१ लाख १६ हजारावर लिलाव; दोन्ही नौकांवर खटला दाखल

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये घुसखोरी करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन पर्ससिननेट नौकांवर १४ हजार किलो मासळी सापडली आहे. सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाने त्याचा जाहिर लिलाव लावला. फिशमीलसाठी लागणारा तारली मासा होता. प्रति किलो ८ रुपये या प्रमाणे १ लाख १६ हजार दरम्यान याचा लिलाव झाला. ही रक्कम शासन दरबारी जमा केली असून सहायक आयुक्तांकडे दोन्ही नौका मालकांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.

सागरी सुरक्षा शाखेच्या पोलिसांची गस्त सुरू असताना काल सकाळी आरे-वारे परिसरात मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या दोन पर्ससिन नौका पकडण्यात आल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर त्या भगवती बंदरात आणण्यात आल्या. तेथे रत्नागिरी मत्स्यखात्याच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या. या दोन्ही नौकांवर तांडेलसह सुमारे ३०, ३५ खलाशी होते. परंतु मत्स्य विभागाने त्यांची जबाबदारी घेतली नाही.

त्यांना तांडेलच्या स्वाधीन करण्यात आले. मिसीपीसी -१ व स्टार ऑफ विलीनकिनी-२ अशी पकडण्यात आलेल्या दोन्ही नौकांची नावे आहेत. मत्स्य विभागाने दोन्ही बोटींवरील मासळीचा पंचनामा केला. यामध्ये एका बोटीवर ८ हजार ३०२ किलो तारली सापडली. याचा जाहिर लिलाव करण्यात आला. तिघांनी त्यामध्ये भाग घेतला आणि ६६ हजार ४१६ बोलीवर लिलाव झाला. दुसऱ्या नौकेवर ६ हजार २५२ किलो मासळी सापडली. त्याचाही लिलाव करण्यात आला तो लिलाव ५० हजार ०१६ रुपयावर झाला.

मत्स्य विभागाने केलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये सुमारे १ लाख १६ हजाराच्यावर रक्कम आली. ती शासनदरबारी जमा करण्यात आल्याचे मत्सय विभागाने सांगितले. आता दोन्ही नौकांविरुद्ध सहायक मत्स्य आयुक्तांकडे श्री. भादुले यांच्याकडे खटला भरण्यात आला आहे. संबंधित नौका मालकांना नोटीसा पाठवून त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर कायद्यानुसार मिळालेल्या मासळीच्या पाच पट दंड केला जाण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही नौका मत्स्य विभागाने ताब्यात ठेवल्या असून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.