दोन दुचाकीच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिपळूण:- गुहागर-कराड-विजापूर महामार्गावर, चिपळूणजवळ मौजे सती संभाजीनगर येथे एका भरधाव आणि ‘रॉंग साईड’ने आलेल्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. ही घटना ०३ ऑक्टोबर रोजी घडली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा कराड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दुसऱ्या दुचाकीस्वारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा दुर्दैवी अपघात दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी दुपारी साधारण ०४.३० वाजण्याच्या सुमारास सती संभाजीनगर येथील रॉयल एनफिल्ड बुलेटच्या शोरूमजवळ आणि ताडे चिकन दुकानासमोर घडला.

याबाबत रणजीत मनोहर गमरे (वय ४०, रा. वेहेळे, चिपळूण) यांनी १७ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या सागर विजय गमरे (रा. वेहेळे, चिपळूण) हा हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल (क्र. एम.एच.०८/बी.एच.१६८६) घेऊन वेहेळेकडून काचिळतळी चिपळूणच्या दिशेने जात होता.

तो सती संभाजीनगर येथे महामार्गावर आला असता, चिपळूण बाजूकडून येणाऱ्या दिनेश चंद्रकांत पाटील (रा. सती, ता. चिपळूण) याने त्याच्या ताब्यातील होंडा कंपनीची लिओ मोटार सायकल (क्र. एम.एच.०९/एफ.के.३३४८) अत्यंत हयगयीने आणि भरधाव वेगात चालवली. एवढेच नाही, तर दिनेश पाटील याने ‘रॉंग साईड’ला येऊन समोरून येणाऱ्या सागर गमरे याच्या मोटार सायकलला जोरदार ठोकर मारली.

अपघात इतका भीषण होता की, यात सागर गमरे याच्या चेहरा आणि डोक्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. त्याला तात्काळ कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आरोपी दिनेश चंद्रकांत पाटील याच्या बेजबाबदार आणि भरधाव वाहन चालवण्यामुळेच सागर गमरे याला जीव गमवावा लागला, तसेच स्वतःला गंभीर दुखापती झाल्या आणि दोन्ही मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले.

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गु.आर. क्र. २४०/२०२५ नुसार भारतीय संहिता कायद्याच्या (आताच्या भारतीय न्याय संहिता) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली दिनेश चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.