रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथे दुचाकी स्वाराने दारूच्या नशेत दोन कारला धडक देत अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिपक आनंद जाधव ( ४४ , रा . मांडवी , रत्नागिरी ) असे आरोपीचे नाव आहे . न्यायालयाने त्याला बुधवार 18 जानेवारी रोजी ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली . ही घटना २९ डिसेंबर २०२२ सकाळच्या सुमारास शिवाजी नगर रस्त्यावर घडली होती .
सविस्तर वृत्त असे की, आरोपी दिपक जाधव हा मद्य सेवन करुन दुचाकी ( एमएच -०८ एजी २१८३ ) घेऊन साळवी स्टॉप ते माळनाका असा जात होता . शिवाजीनगर बस स्टॉप येथे तो आला असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या मोटार ( एमएच -०८ आर ०१८५ ) ला पाठीमागून ठोकर दिली . त्यामुळे ती मोटार रस्त्याच्या पलिकडे थांबलेल्या मोटार ( एमएच -०८ एजी ०३६० ) वर आदळून अपघात झाला . दोघे मोटार चालक किरण शांताराम शिंदे व निखील सुनिल सावंत यांना दुखापत झाली तर तिनही वाहनांचे नुकसान झाले . या प्रकरणी किरण शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तपासात पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते . बुधवारी या खटल्याचा निकाल न्यायालयात झाला . आरोपीने गुन्हा कबुल केल्याने न्यायालयाने आरोपीला ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली .









