Saturday, September 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळसह माथेरानची पाहणी

देशातील पहिल्या ‘स्पेस पार्क’साठी माचाळसह माथेरानची पाहणी

१८ महिन्यांत ५ उपग्रह सोडण्याचा राज्याचा मानस: उदय सामंत

रत्नागिरी:- महाराष्ट्राला अंतराळ तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. देशातील पहिला भव्य ‘स्पेस पार्क’ महाराष्ट्रात उभारण्याचा शासनाचा मानस असून, त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ आणि माथेरान या दोन ठिकाणांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या १८ महिन्यांत राज्याचे स्वतःचे पाच उपग्रह विकसित करून त्यांचे प्रक्षेपण करण्याचा संकल्प असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या ‘वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक २०२६’ परिषदेत अंतराळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. पॅरिस दौऱ्यावरून परतल्यानंतर वेंगुर्ला येथील आपल्या मूळ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि शहरप्रमुख अजित राऊळ आदी उपस्थित होते.

राज्याच्या प्रस्तावित स्पेस पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पॅरिसमधील जागतिक प्रदर्शन आणि परिषदेत झालेला संवाद महत्त्वाचा ठरला आहे. प्रस्तावित पाच उपग्रहांचा उपयोग शेती, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, नगररचना व नियोजन, सार्वजनिक आरोग्य तसेच उद्योग क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी करण्यात येणार आहे.

उपग्रह निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी जागतिक स्तरावरील संबंधित कंपनीसोबत चर्चा झाली असून, प्राथमिक टप्प्यात सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पातून भविष्यात सुमारे १ हजार कोटी रुपयांचा महसूल निर्माण होण्याची क्षमता असल्याचे सामंत यांनी सांगितले. सध्या या प्रस्तावाचा सविस्तर तांत्रिक अभ्यास आणि व्यवहार्यता तपासणी सुरू आहे.

अंतराळ क्षेत्रातील उद्योग आणि संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यात येत्या फेब्रुवारी महिन्यात भव्य ‘स्पेस फेस्ट’ आयोजित करण्यात येणार आहे. रॉकेट, ड्रोन, अंतराळ संशोधन आणि स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित जगभरातील नामांकित कंपन्यांना महाराष्ट्रात आणून स्पेस पार्कमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, उपग्रहाशी संबंधित प्रकल्पासाठी अनुकूल हवामान आणि उंचीची आवश्यकता लक्षात घेऊन माथेरान तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ या दोन ठिकाणांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. मात्र, स्पेस पार्कसाठी अंतिम जागेची अद्याप निश्चिती झालेली नाही.

यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांबाबतही उद्योगमंत्री सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोणताही निर्णय घेताना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. आंदोलन मागे घेतल्याबद्दल मनोज जरांगे-पाटील यांचे आभार मानत २०२४ मधील आरक्षण कायद्याचा दाखला देत सामाजिक सलोखा राखून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.