रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ३७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची खबर आनंद शितलप्रसाद शर्मा (सध्या रा. देवळे कॅम्प, मुळ रा. सरोखनपूर, ता. बदलापूर, जि, जैनापूर) यांनी दिली. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. आनंद शर्मा हे नाणीज येथे महामार्गावर सुपरवायझर म्हणून हजर होते. याचवेळी कंपनीतील चालक सुरज याने शर्मी यांना एक इसम देवळे फाटा येथे जखमी अवस्थेत पडल्याचे सांगितले. यानुसार शर्मा यांनी घटनास्थळी जावून खात्री करत मॅनेजर राहुल सिंग यांना माहिती दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणाला कंपनीच्या वाहनातून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
कालीचरण यादव (३७, रा. धनई हरदासपुर भोसमपूर मेहरनगर, जि. आजमगड, रा. उत्तरप्रदेश) असे मृत तरूणाचे नाव आहे. वाहनाने धडक दिल्याने कालीचरण याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम ३०४ (अ), २७९,३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.