मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश
संगमेश्वर:- तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यरत असलेली मोबाईल मेडिकल युनिट बंद असल्याच्या प्रकाराची जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी संगमेश्वर मोबाईल मेडिकल युनिटच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एक ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात संगमेश्वर तालुक्यातील मोबाईल मेडिकल युनिट वाहन बंद असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधितांकडून खुलासा मागवला आहे. नोटिशीनुसार, एमएमयू वाहनाचे टायर खरेदीचे देयक कार्यालयाकडून १८ ऑगस्ट रोजी आदा केले असून, त्याबाबत कार्यालयाला कळवले होते. तरीही वाहन आरोग्यसेवेसाठी कार्यान्वित केले नसल्याचे नमूद केले आहे.
तसेच एमएमयूअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याने नियोजित आरोग्यसेवा तातडीने सुरू करावी, नियोजित क्षेत्रभेटी व आरोग्य शिबिरांमध्ये उपस्थित राहावे आणि एमएमयूच्या कामकाजाबाबत आवश्यक माहिती वरिष्ठ कार्यालयाला सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एमएमयू सेवा बंद राहण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही न केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे नोटिशीत नमूद आहे. तसेच यापूर्वीच्या दैनंदिन कामकाजाचा अहवालही कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नसल्याचे नमूद केले आहे.
४८ तासांची मुदत
मोबाईल मेडिकल युनिट कार्यान्वित नसल्याने कार्यक्षेत्रातील लाभार्थी आरोग्यसेवेपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी कोणाची, याबाबत खुलासा मागवला आहे. संबंधितांनी नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत खुलासा सादर करावा अन्यथा महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.









