Sunday, November 15, 2026
spot_img
Home संगमेश्वर देवरुखमध्ये कोकम सरबत कारखान्यात अनधिकृत शेड बांधल्याप्रकरणी गुन्हा

देवरुखमध्ये कोकम सरबत कारखान्यात अनधिकृत शेड बांधल्याप्रकरणी गुन्हा

नोटीस देऊनही बांधकाम न काढल्याने कारवाई

देवरुख:- येथील अजरामर कोकम सरबत कारखान्यामध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या लोखंडी शेड बांधून, नोटीस बजावूनही ते न हटवल्याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीमती श्रद्धा अरंजय कांबळे (वय २७, रा. दत्तनगर, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे.

हा अनधिकृत बांधकामाचा प्रकार दि. १५ जुलै २०२६ ते दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मौजे देवरुख (ता. संगमेश्वर) येथे घडला असून, याबाबत दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.२४ वाजता पोलिसांत अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

यातील आरोपी कल्याणी जयंता सरदेशपांडे (रा. मधली आळी, देवरुख, ता. संगमेश्वर) यांनी आपल्या मालकीच्या अजरामर कोकम सरबत कारखान्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता लोखंडी पत्र्याचे छप्पर आणि चारही बाजूंनी लोखंडी जाळीने बंदिस्त असलेले शेड अनधिकृतपणे उभारले आहे.

या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आरोपी यांना रीतसर नोटीस देऊन ते काढून घेण्याबाबत कळवण्यात आले होते. मात्र, नोटीस मिळूनही संबंधित अनधिकृत बांधकाम अद्यापपर्यंत काढून न घेतल्याने अखेर याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या फिर्यादीवरून देवरुख पोलिसांनी आरोपी कल्याणी सरदेशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७१/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ५३ चा भंग केल्याप्रकरणी कलम ५४ व ५५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.