लांजा:- अचानकपणे लागलेल्या वणव्यात सुमारे ३० एकर क्षेत्रावरील जंगली झाडे तसेच दहा ते बारा शेतकऱ्यांच्या आंबा व काजूची शेकडो झाडे होरपळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ही घटना शुक्रवार ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील बौद्धगाव ते मणचे तर्फे देवधे परिसरात घडली आहे.
वणव्याची माहिती मिळताच लांजाचे निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार तसेच राजापूर येथील अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यांच्या समन्वयातून तातडीने अग्निशामक बंब घटनास्थळी पाठविण्यात आला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर अग्निशामक बंबाच्या सहाय्याने तसेच ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे वनवा अखेर आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरात आणखी मोठ्या प्रमाणावर होऊ शकणारे नुकसान टळले.
या घटनेदरम्यान पुनस मंडळाचे मंडळ अधिकारी रोहीदास राठोड यांच्यासह इतर अधिकारी, देवधेचे सरपंच राजाराम हरमले, पोलीस पाटील संदीप कांबळे तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेत आंबा आणि काजूची झाडे होरपळून गेल्याने संबंधित बागायतदार, शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.









