खेड:- खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील एका १७ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून चिपळूणमधील डेरवण येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज मनोज मिरजोळकर (वय १७, रा. भरणे बाईतवाडी) हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना गाडी अचानक स्लिप झाली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्वराजच्या मित्राने तातडीने त्याच्या वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली आणि त्याला उपचारासाठी खेड येथील डॉ. उपेंद्र तलाठी यांच्या रुग्णालयात दाखल केले.
डॉ. तलाठी यांनी स्वराजवर प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी चिपळूण येथील वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेने डेरवण येथे नेले. तेथे ६ मार्च रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास उपचार सुरू असताना स्वराजचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचे वडील मनोज भास्कर मिरजोळकर यांनी खबर दिली आहे. या घटनेची नोंद सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, त्यानंतर ती खेड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
स्वराजच्या अकाली निधनाने भरणे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









