रत्नागिरी:- दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी तसेच शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करत, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘दिव्यांग हक्क यात्रे’चा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा महासभेसह समारोप सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी बच्चू कडू यांनी सत्ताधारी राजकारण्यांच्या प्राधान्यक्रमावर परखड भाष्य करत, दिव्यांगांसाठी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
प्रहार संघटनेची रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महासभा हक्क यात्रेचा समारोप सोमवारी रत्नागिरीत झाला. यावेळी उबाठा शिवसेनेचे उपनेते बाळ माने, कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे , अशोक जाधव, ठाणे जिल्हाप्रमुख काजल नाईक, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी , श्री. खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या इतिहासातून ऊर्जा घेत, त्यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. दिव्यांगांच्या मानधनात झालेली किरकोळ वाढही खऱ्या गरजूंसाठी मोलाची असल्याचे सांगत, त्यांनी मानधन सहा हजार रुपये झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.मंदिरे, मशीद किंवा पुतळ्यांसाठी कोट्यवधींचा निधी देणारे लोकप्रतिनिधी स्वतःच्या निधीतून एखाद्या दिव्यांगाचे घर का उभे करत नाहीत? असा थेट सवाल कडू यांनी उपस्थित केला. एकदा सत्ता आल्यावर नेते सामान्य माणसाला विसरतात, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोकणच्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या शोषणावर बोट ठेवत, आंबा, काजू आणि मच्छीमार बांधवांचे कष्ट व्यापाऱ्यांच्या हाती लागल्यावर कसे वाया जातात, हे सांगितले. कोकणातील लोक गरीब राहिले तर शहरांतील कंपन्यांना स्वस्त मजूर मिळतात, हे ‘गरीब ठेवण्याचे जाणीवपूर्वक केलेले तंत्र’ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुंबई-गोवा-रत्नागिरी रस्त्याची दुर्दशा अनेक वर्षे कायम असून, खेड्यातील जीवन जाणीवपूर्वक वाईट केले जात असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला.जातीय आणि धार्मिक राजकारणावर हल्ला चढवताना ते म्हणाले, “मनगटात जोर नसतो तेच लोक जात आणि धर्म घेऊन फिरतात, ज्याच्या मनगटात जोर असतो तो हक्काची लढाई लढतो.” सामान्य लोकांना मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्यासाठी जाती-धर्माच्या नावावर भांडणे लावली जातात. गरीब माणूस राजकारणातला ‘बोकड’ बनला आहे. त्यांनी स्वतः जाती-धर्माचे राजकारण न केल्यामुळेच मंत्रीपद गमावले असले तरी सामान्य माणसासाठी लढत असल्याचे सांगितले.
भाषणाच्या समारोपात माजी आमदार कडू यांनी आगामी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. दिव्यांग, शेतकरी आणि कोकणी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी तीन महिन्यांची मुदत देऊन, त्यानंतर सिंधुदुर्ग ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्याचा आणि मुंबईत अधिवेशन घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते सुरेंद्र ऊर्फ बाळासाहेब माने यांनी संघर्ष आणि एकजुटीच्या गरजेवर भर दिला. त्यांनी बच्चू कडू यांचे गेली २५ वर्षे शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी असलेले तळमळीचे काम आणि संघर्षशील प्रवास याची प्रशंसा केली. माने यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “पालक कसा असतो? तो कुटुंबाचं संरक्षण करतो, कुटुंबाचा प्रमुख असतो. पण हे कुठे पालक आहेत मला माहिती नाही.” राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी गेल्या तीन ते पाच वर्षांत दिव्यांग जणांना त्यांच्या हक्काचा नियमानुसार असलेला जिल्हा नियोजन मंडळाचा निधीदेखील दिला नाही, असा आरोप करत त्यांनी “असे पालकमंत्री राहण्यास पात्र नाहीत,” असे मत व्यक्त केले.
जयगड परिसरातील औद्योगिकीकरणामुळे झालेल्या बकास परिस्थितीवर चिंता व्यक्त करत, माने यांनी दिव्यांगांचे नेते बच्चू कडू यांच्या संघर्षाच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. आपण स्वतः एका तत्त्व म्हणून ‘मस्तवाल’ आमदाराविरोधात संघर्ष करण्याकरता पक्ष बदलून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. भविष्यकाळात महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी राज्य यावे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.









