पन्हळे तर्फे सौंदळ येथील घटना
राजापूर:- तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथील एका ४१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३० जानेवारीच्या रात्री घडली असून, राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रघुनाथ दत्ताराम चव्हाण (वय ४१, रा. पन्हळे तर्फे सौंदळ, चव्हाणवाडी, ता. राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ चव्हाण हे दारूच्या व्यसनाधीन होते. ३० जानेवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास त्यांनी दारूच्या नशेत राहत्या घरी कोणतेतरी विषारी द्रव्य प्राशन केले. यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या.
रघुनाथ यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, ३१ जानेवारी रोजी सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास रुग्णालयात तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची खबर मयताचे चुलते विजय राजाराम चव्हाण यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.









