दाभोळे बाजारपेठेत डंपरची दुचाकीला धडक

रिव्हर्स घेताना अपघात, डंपर चालकावर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेतील पुलाजवळ एका डंपरने पाठीमागे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपर चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन निष्काळजीपणे रिव्हर्स घेतल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार सुदैवाने बचावला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधूत हरिश्चंद्र बेलकर (वय ३७, रा. बेलकरवाडी, दाभोळे) हे सोमवारी, २३ मार्च २०२६ रोजी पहाटे ३:४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील होंडा शाईन (क्र. MH 08 BA 5167) ने प्रवास करत होते.
​दाभोळे बाजारपेठेतील पुलाच्या अलीकडे आरोपी डंपर चालक बेनी नवल सिंह भुमिया (वय ३२, मूळ रा. जबलपूर, मध्यप्रदेश) याने आपल्या ताब्यातील डंपर (क्र. MH 16 DP 1589) पाठीमागे कोणते वाहन आहे याची खात्री न करता अचानक रिव्हर्स घेतला. यावेळी डंपरची धडक बेलकर यांच्या दुचाकीला बसली आणि डंपरचे चाक दुचाकीवरून गेल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

​या प्रकरणी अवधूत बेलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संगमेश्वर पोलीस ठाण्यात रात्री ९:३४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.