रत्नागिरी:-अवकाळी पावसाचा जोर ओसरू लागला असून कोकणात गुलाबी थंडीचे वारे वाहू लागले आहेत. हे वातावरण आंबा पिकाला अनुकूल असून पर्यटकांसाठीही दिलासादायक ठरणार आहे. दापोलीत किमान पारा 14 अंशापर्यंत खाली आल्यामुळे हवेतील गारवा वाढला आहे; मात्र या बदलांचा आंबा बागायतदारांसाठी किती फायदा होईल हे पुढील आठवड्यात दिसून येणार आहे.
मागील महिन्यात अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांच्या मेहनतीवर पाणी फिरवले होते. डिसेंबरच्या सुरवातीलाही परिस्थिती जैसे थे राहिल असेच वाटत होते; परंतु दोन दिवसांपुर्वीपासून हवेने मार्ग बदलला आहे. अवकाळीचे सावट सरु लागले आहे. कमाल व किमान तापमानात घट झाली असून हवेत थंडी जाणवू लागली आहे. उत्तरेकडून येणार्या वार्यामुळे तापमानातील घट झाल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पहाटेच्या तापमानात घट झाली असून दिवसाही पारा 20 अंशापर्यंत खाली आला आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्या दापोलीमध्येही किमान पारा 14 अंशावर आला आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कमाल पारा 30 अंशापर्यंत आला आहे. परंतु आगामी आठवड्यात पावसाचीही शक्यता वर्तविली आहे. हा पाऊस मोजक्याच जागात पडणार आहे.
थंडीला सुरवात झाल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटायला लागणार आहे. कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे बाहेर पडले असून काहींनी खरेदीला करण्यास सुरवात केली आहे. या वातावरणामुळे कोकणातील किनारी भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. दापोली तालुक्यात थंडीचा अनुभव घेण्यासाठी परजिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे.
ऐन हंगामाच्या तोंडावर पावसाने घात केल्यामुळे पाच टक्केहून अधिक मोहोराचे नुकसान झाले आहे. फवारण्या करणार्या बागायतदारांनी मोहोर टिकवला असला तरीही बारीक कैरीवर काळे डागे पडले आहेत. पानांवरही काळे डाग दिसत आहेत. हे प्रमाण सध्या कमी असले तरीही पुन्हा पाऊस पडला तर झालेल्या नुकसानीत भर पडणार आहे. गेले दोन दिवस पडणार्या थंडीमुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. काही झाडांना पालवी येत असून थंडी कायम राहिली तर आठ दिवसात मोहोर येण्याची शक्यता आहे. मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे झाडांच्या मुळात ओलावा आहे. तो कमी झाल्याशिवाय पुढील अंदाज करता येणार नाही. सध्याचे वातावरण अनुकूल असल्याने पावसापासून वाचलेल्या मोहोरातून फळधारणा लवकर होईल.