Thursday, October 8, 2026
spot_img
Home दापोली दहागावात गुरांच्या गोठ्याला भीषण आग

दहागावात गुरांच्या गोठ्याला भीषण आग

दोन दुभत्या गाईंचा होरपळून मृत्यू

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील मौजे दहागाव निमदेवाडी येथे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका गुरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन दुभत्या गाईंचा होरपळून दुर्दैवी अंत झाला. महेंद्र रामचंद्र चव्हाण व नीलेश रामचंद्र देवरुखकर यांच्या सामायिक गोठ्याला ही आग लागली असून, यामध्ये जनावरांसह लगतची लाकडी खोपी आणि गोठा जळून खाक झाल्याने पशुपालकांचे सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

घटनेच्या वेळी गोठ्यात दोन गाई व दोन वासरे बांधलेली होती. आगीच्या ज्वाळा दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने तिकडे धाव घेतली आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत दोन वासरे तसेच एका गाईला आगीच्या भक्ष्यस्थानातून सुरक्षित बाहेर काढले. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने उर्वरित दोन दुभत्या गाईंना वाचवण्यात यश आले नाही आणि त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी एकदिलाने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत गोठ्यासह लाकडी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते; आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच महसूल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूश, सरपंच मंगेश दळवी, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या अधिकृत पंचनाम्यानुसार गोठ्याचे अंदाजे ८० हजार आणि दोन मृत गाईंचे ८० हजार असे मिळून एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान नोंदवण्यात आले आहे. हाताशी आलेले दुभते पशुधन नष्ट झाल्याने संबंधित शेतकरी कुटुंबे मोठ्या संकटात सापडली असून, शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.