26 कोटींच्या रस्ते कामांचे भूमिपूजन
रत्नागिरी:- दसऱ्याच्या मुहूर्तावर रत्नागिरी शहरात शिवसेनेकडून विकासकामांचा अक्षरशः धुमधडाका करण्यात आला. विरोधकांकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची बोंब मारली जात असताना दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात 26 कोटी खर्च करून शहरांतर्गत येणाऱ्या 100 किलोमीटर रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागात एकाचवेळी भूमिपूजन होणारा हा सर्वात मोठा कार्यक्रम ठरला.
शहरात सुधारित नळपाणी योजना, गॅस पाईपलाईन आणि महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू आहे. या तिन्ही योजनांचे एकत्रित काम सुरू असल्याने शहरातील रस्त्यांची पुरती अवस्था झाली आहे. योजनांच्या कामाकडे दुर्लक्ष करून विरोधकांकडून सोशल मीडियावर केवळ आरोप केले जात असताना या आरोपांना ना. सामंत यांनी कामाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
शहरात दसऱ्याच्या शुभदिनी 26 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या 100 किलोमीटर शहरअंतर्गत रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा शहरातील चार ठिकाणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, उद्योजक किरण सामंत, जि. प. सदस्य बाबूशेठ म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर महिला आघाडीप्रमुख मनीषा बामणे यांच्यासह सर्व नगरसेवक, युवासैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.









