रत्नागिरी:- ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी केलेल्या विनंतीनंतर उद्योजक किरण सामंत यांच्या सूचनेवरून ईद होईपर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा केला जात होता. उद्यापासून पालिका पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे. वाढत्या उष्म्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासून नये, यासाठी पालिकेने खबरदारी म्हणून दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.
शीळ धरणातूनच रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जातो. शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल, नाचणे येथील तलाव हे स्रोत आहेत. परंतु पानवल धरणातील गाळ काढण्यात आला नसल्याने कमी पाणी साठा होतो. त्यात नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू असल्याने पानवलचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शहराची संपुर्ण भिस्त आता शीळ धऱणावर आहे. त्यात प्रचंड उष्मा असल्याने पालिकेने भविष्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी पाण्याचे नियोजन केले आहे. शीळ धरणांमध्ये १५ ते २० जूनच्यापुढे पाणी पुरले एवढा साठा आहे. परंतु हवामान खात्याने पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविल्याने खबरदारी म्हणून पालिकेने काही दिवसांपूर्वीच शहराला दिवसाआड पाणी पुवरठा करण्याचा निर्णय घेतला.
शहरात दहा हजाराच्यावर नळजोडणीधारक आहेत. त्यांना दिवसाला सुमारे २० एमएलडी पाणी लागते. नवीन पाणी योजना अंमत टप्प्यात असून गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन म्हणून शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होता. दरम्यान ईद असल्याने हा सण होईपर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी मुस्लिम बांधवांची होती. उद्योजक किरण सामंत यांच्याकडे तसे मत मांडल्यानंतर सामंत यांच्या सूचनेने पुन्हा नियमित पाणी पुरवठा सुरू केला. ईद संपल्यामुळे आता उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे.









