ताबा पावती झाली मात्र जमीनधारक अद्यापही मोबदल्याच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- रत्नागिरी- मि-या- नागपूर महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनींचे भुसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रथम भुसंपादन होऊन निवाडा रक्कम जाहीर झाली. रत्नागिरी तालुक्यातील साठरे, बाजारपेठ, पाली, खानू येथील जमीनधारकांकडून सप्टेंबर महिन्यात ताबा पावती शासनाने करुन घेतली; मात्र यातील काही ठराविक जमीनधारकांचीच मोबदला रक्कम बँक त्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरीत खातेधारक गेले दोन महिने प्रतिक्षेत असून प्रांत कार्यालयाकडून कोरोनाचे कारण दिले जात आहे.

राज्यभरात सुरु असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न सुरु आहेत; मात्र जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. मिर्‍या-नागपुरसाठीची भुसंपादन प्रक्रिया 2017 साली सुरु झाली होती. ज्या जमीनधारकांच्या जमिनी, बांधकामे, झाडे व इतर संसाधने ही संपादीत होऊन बाधित आहेत, त्यांचे शासनाच्या संयुक्त मुल्याकंन समितीव्दारे मुल्याकंन करुन घेण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्यांचे मोबदला भरपाई रक्कमेचे हस्तांतरण फेब्रुवारी महिन्यातच भुसंपादन अधिका-यांकडे वर्ग केले आहेत. त्याच प्रक्रियेतील रत्नागिरी तालुक्यातील साठरे, बाजारपेठ, पाली, खानू या गावातील भुसंपादीत जमिन मालकांकडून गेल्या सप्टेंबर महिन्यात भुसंपादन अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी ताबा पावती करुन घेतली; मात्र काही ठराविक जमिनधारकांचाच तात्काळ भुसंपादन मोबदला वाटप करण्यात आला. संबंधित जमिनधारकांच्या खात्यात रक्कम गेल्या महिन्यात जमा  करण्यात आली. उर्वरीत जमिन मालकांचा मोबदला वाटप करण्यात आलेला नाही. महामार्ग चौपदरीकरणाचा जाहीर झालेला मोबदला काही ठराविक खातेदारांच्याच खात्यात जमा होत असल्यामुळे साशंकता व्यक्त केली जात आहे. गेले दोन महिने हे वाटप का थांबविण्यात आले याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सक्षम प्राधिकारी तथा भुसंपादन अधिकारी यांनी उर्वरीत मंजूर निवाडा रक्कमेतील मोबदला वाटप तात्काळ करण्याची मागणी जमीन धारकांकडून होत आहे.